सांगली : कोरोनामुळे शासकीय पातळीवर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असले तरीही राज्य उत्पादन शुल्कच्या जिल्हा विभागाने उद्दिष्टपूर्ती साधली आहे. महसूल वसुलीसाठी केलेले नियोजन व सातत्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा ११६ टक्के महसूल संकलित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.
सन २०२०-२१ या मागील आर्थिक वर्षात सांगली विभागास २७६ कोटी रुपयांचे महसूल उदिष्ट देण्यात आले होते. या संपूर्ण कालावधीत कोरोनामुळे अडचणी असतानाही विभागाने ३२२ कोटी राज्य शासनास मिळवून दिले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा ११६ वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात अलाईड ब्लेंडर्स ॲण्ड डिस्टलरी या नवीन मद्य उत्पादक कंपनीच्या वतीने सांगलीत मद्य उत्पादन सुरू करण्यात आले आहे. त्याचाही फायदा होत महसूल वसुलीत मदत झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात उद्दिष्टपूर्ती झाल्याने एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात ४३५ कोटींचे उद्दिष्ट मिळाले असून, ते गेल्या वर्षीपेक्षा ३५ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू असतानाही गेल्या दोन महिन्यात केवळ सांगलीतून ३० कोटींचा महसूल जमा करण्यात आला आहे.
कोट
कोरोनास्थितीमुळे अडचणी असतानाही जिल्ह्यातून महसूल वसुली करण्यात यश मिळाले आहे. प्रशासनाने केलेेल्या नियोजनामुळे उद्दिष्टांपेक्षा जादा महसूल संकलित होऊ शकला. या वर्षातही महसूल उद्दिष्टपूर्तीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
संध्याराणी देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क