सांगली : महांकाली सहकारी साखर कारखाना चुकीच्या ठिकाणी उभा केला आहे. तसेच व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचा कर्जाचा बोजा वाढला आहे. कर्जात बुडालेला महांकाली कारखाना फुकट चालविण्यास दिला तरी राजारामबापू साखर कारखान्याने घेऊ नये, असा सल्ला शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी दिला. तसेच कारखान्याने सभासदांच्या शेअर्सची किंमत वाढवून ती १५ हजार रुपये करू नये, असेही त्यांनी सांगितले.राजारामबापू कारखान्याच्या वार्षिक सभेत महांकाली कारखाना चालविण्यास घेण्यासह शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संजय कोले बोलत होते. ते म्हणाले, मुळात माणगंगा- आटपाडी, डफळे-जत, यशवंत-नागेवाडी, महांकाली हे साखर कारखाने चुकीच्या ठिकाणी उभारले आहेत. जिथे कच्चा माल म्हणजे ऊस पिकण्याची व मिळण्याची शाश्वती नाही. लाखो वर्षे जिथे दुष्काळी परिस्थिती आहे, ज्या भागातील बहुतांश लोक जगण्यासाठी शहर, बागायती पट्ट्यात अथवा सैन्यात गेले आहेत. तत्कालीन पुढाऱ्यांनी राजकारणासाठी चुकीच्या ठिकाणी कारखाने उभारले आहेत. त्यात सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, कर्ज पुरवठादार बँका व सरकारचे पैसे बुडाले आहेत. कामगारही देशोधडीला लागले आहेत. अशाच ठिकाणचा महांकाली कारखाना राजारामबापू कारखान्याने फुकट चालवायला दिला तरी तो व्यवस्थापनाने घेऊ नये. कारण, डफळे कारखाना चालवायला घेऊन राजारामबापू कारखान्यास किती तोटा झाला याचा व्यवस्थापनाने अनुभव घेतला आहे. हा अनुभव पाठीशी असताना महांकाली चालविण्यास घेणे, म्हणजे राजारामबापू कारखाना आर्थिक संकटात टाकणारा निर्णय आहे. तसेच तुम्ही कितीही कारखाने चालविण्यास घ्या, पण शेअर्सची किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच शेअर्सची किंमत वाढवायची असेल तर शेअर्सची वाढीव रक्कम कारखान्याने भरली पाहिजे.
संपत्ती वाढविण्यावर भरएफआरपी देणे शक्य नाही तर राजारामबापू कारखाना ‘महांकाली’ हे पाचवे युनिट कशासाठी घेत आहेत. उसाला तीन हजार ५०० रुपये दर शेतकऱ्यांना न देता कारखाना व्यवस्थापन संपत्ती वाढवण्याकडे लक्ष देत आहे. राजारामबापू कारखान्यास सर्वाधिक साखर उताऱ्याचा ऊस पुरवठा होत आहे. टनाला १० ते १२ किलो साखर उतारा जास्त आहे. तरीही कारखाना एफआरपीपेक्षा जास्त दर देत नाही हे पूर्णत: चुकीचे आहे, याबद्दल कोले यांनी नाराजी व्यक्त केली.