उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

By अशोक डोंबाळे | Published: January 2, 2023 04:40 PM2023-01-02T16:40:26+5:302023-01-02T16:42:19+5:30

राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

Even if Uddhav Thackeray-Balasaheb Ambedkar come together, nothing will happen, Union Minister of State Ramdas Athawale told the reason | उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरी काही होणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण

Next

सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक, ना आंबेडकर यांच्याकडे भीमसैनिक. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हसुद्धा एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आहे, असा दावा आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.

रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही; कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे. तर शिवशक्ती एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. शिंदे यांचं मोठं बंड आहे. सध्या त्यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आणि १२ पेक्षा अधिक खासदार आहेत. शिंदे गटात शिवसेनेमधून आलेल्या आमदार, खासदार आणि पक्षातील कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेतल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिंदे गटालाच मिळणार आहे.

शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागावाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही. शिंदे गट, भाजप आणि आरपीआय युतीलाच २०२४ च्या निवडणुकीत मोठे यश मिळणार असून, राज्यात पुन्हा युतीचीच सत्ता येणार, असा दावाही त्यांनी केला.

आठवले पुढे म्हणाले, आरपीआय पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असल्यामुळे अन्य पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन आरपीआयलाच पाठबळ दिले पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आरपीआयचे राज्यस्तरीय अधिवेशन ५ आणि ६ मे रोजी कोल्हापुरात घेणार आहोत. मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून पक्ष बांधणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

राऊत, गांधींचा दावा चुकीचा

खासदार संजय राऊत म्हणतात तसे राज्यात सत्तांतर होणार नाही, राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यंत कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडण्याची नाही, तोडण्याची यात्रा आहे. पहिला काँग्रेस जोडा आणि नंतर देश जोडा, असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला.

मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा

आगामी लोकसभा निवडणुकीत बीजेपीचे ३५० आणि एनडीएचे ४५० खासदार निवडून येणार आहेत. सध्या भाजपने देशातील पराभूत १४४ लोकसभेच्या जागांवर विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आरपीआयला आम्ही महाराष्ट्रातील दोन जागा मागणार आहोत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून आरपीआयला मंत्रिपद आणि महामंडळे दिली पाहिजेत, अशी मागणीही आठवले यांनी केली.

महाआघाडीमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित

मराठा समाजाला ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र आरक्षण दिले पाहिजे. यासाठी न्यायालयात महाविकास आघाडीच्या सरकारने व्यवस्थित भूमिका मांडली नाही. म्हणूनच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

Web Title: Even if Uddhav Thackeray-Balasaheb Ambedkar come together, nothing will happen, Union Minister of State Ramdas Athawale told the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.