सांगली : सांगलीच्या समाजकारण आणि राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा सांगलीच्या एखाद्या जनावरालासुद्धा विचारलं तर ते सांगेल की सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला. तसेच, सांगलीत बदल घडावा म्हणूनच विशाल पाटील यांना उमेदवारी मागत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगलीच्या जागेसाठी कोणी आग्रही भूमिका घेतली, कोणी घेतली नाही यावर मी बोलणार नाही. सांगलीची जागा परंपरेनं काँग्रेसची आहे, आमचं मजबूत संघटन असून ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत. दिल्लीत राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नागपुरात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. त्यांनाही सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेल्या तिढ्याबद्दल बोललो आहे. काँग्रेस पक्ष आम्हाला जे सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असणार आहे.आम्हाला मित्र पक्षाने इशारा देऊ नये, इशारा देण्याची आवश्यकता नाही. काँग्रेस हा सव्वाशे वर्षांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आजच्या बैठकीला विशाल पाटील माझ्यासोबत आहेत. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्यास आम्ही इच्छुक आहेत. हीच भावना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे सांगितली आहे. मी राज्यात काम करत असलो तरी आजच्या घडीला फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी इथं आलो आहे. तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवसेना निवडणुकीला सामोरे जात असताना तिन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला कमी लेखले पाहिजे. सांगलीबाबत नाना पटोले यांनी व्यक्त केलेली भावना ही कार्यकर्त्यांची ऐकूनच केली आहे.
सांगलीबाबत मित्रपक्षाने वक्तव्य करू नयेतविश्वजित कदम म्हणाले, सांगलीत गेले दोन निवडणुकीत भाजप खासदार निवडून आला आहे. त्यामुळे बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रूपाने सक्षम उमेदवार आम्ही दिला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये. काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घराघरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य करू नये, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.