संतोष भिसेसांगली : पेट्रोलच्या किंमतीने शतक झळकावल्यानंतरही त्याची बॅटिंग सुरुच आहे. कालपर्यंत शंभराच्या नोटेत लिटरभर पेट्रोल मिळायचे, आता एका नोटेत लिटरपेक्षा कमी मिळू लागले आहे.किंमत चढती आणि इंधन उतरते असा आलेख आता सुरु झाला आहे. आठवडाभरापूर्वी ९९.९६ पैशांत एक लिटर पेट्रोल मिळायचे. तीन दिवसांपूर्वी शंभरी पार करुन १००.०१ रुपये दर झाला, तरीही तितकेच पेट्रोल मिळायचे. मंगळवारी मात्र आणखी दरवाढ होऊन १००.५४ रुपयांवर पोहोचले.
त्यामुळे एक लिटरमध्ये १००० मिली पेट्रोलऐवजी ९९० मिली मिळू लागले आहे. त्यामुळे आता जणू उलटी गिनती सुरु झाली आहे. १०० रुपयांत एक लिटर पेट्रोलचे समाधान दोनच दिवसच राहीले. ग्रामिण भागात १००.६५ रुपये झाल्याने तेथे तर ९८० मिली पेट्रोल मिळू लागले आहे.डिझेलची घोडदौडदेखील सुरुच आहे. मंगळवारी ते ९१.१३ रुपये लिटरवर पोहोचले. अशीच दरवाढ सुरु राहीली तर तेदेखील शंभरी गाठण्याची भिती आहे. लॉकडाऊनमध्ये उत्पन्न शून्याकडे आणि इंधन शतकांपलीकडे अशी गंभीर स्थिती आहे. इंधन दरवाढीचा परिणाम एकूणच महागाई वाढण्यात होऊ लागला आहे.