इस्लामपूर : येथील आधार हेल्थ केअर सेंटरमध्ये मृत झालेल्या महिला रुग्णावर दोन दिवस उपचार करून ४१ हजार रुपये उकळणाऱ्या डॉ. योगेश वाठारकर याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी वाठारकर याला रुग्णालयात आणले होते. दिवसभरात पोलिसांच्या पथकाने रुग्णालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
कासेगाव येथील सलीम हमीद शेख या आचारी काम करणाऱ्या व्यक्तीने बुधवारी डॉ. वाठारकरविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर येथील न्यायालयाने त्याला १२ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांच्या चौकशीत अद्यापही त्याने तोंड उघडलेले नसून ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला आहे.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या गुन्ह्याच्या सगळ्या घटनाक्रमाची माहिती दिली. ६ मे रोजी सलीम शेख यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर या प्रकाराची माहिती घेण्याचे काम पिंगळे यांनी सुरू केले. नगरपालिका प्रशासनाकडे रुग्णालयातून आलेल्या कागदपत्रांची छाननी करताना फॉर्म क्रमांक २ मध्ये खाडाखोड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावर पालिकेतील तीन कर्मचाऱ्यांचे जबाब त्यांनी नोंदवून घेतले. यामध्ये रुग्णालयातून आलेल्या एका व्यक्तीने ही खाडाखोड केल्याचे कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
दरम्यान, १० मे रोजी डॉ. योगेश वाठारकर याला नोटीस पाठवून पिंगळे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि उपचार केलेल्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, वाठारकर याने सीसीटीव्ही फुटेजबाबत तांत्रिक उत्तर देत सायरा शेख या रुग्णावर १० मार्चपर्यंत उपचार केल्याचे स्पष्ट केले. मात्र, या उपचाराची कागदपत्रे त्याने अद्याप पोलिसांकडे सुपूर्द केलेली नाहीत. दरम्यान, पिंगळे यांनी सांगलीच्या अधिष्ठातांकडे १७ मे रोजी या संपूर्ण घटनेचा अहवाल पाठवून अभिप्राय मागविला होता. त्यावर ६ जुलैला गुन्हा नोंद करण्याबाबतचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर हा गुुन्हा नोंद करण्यात आल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले.
चाैकट
‘प्रकाश’मधील चाैघांच्या जामिनावर १४ राेजी सुनावणी
प्रकाश हॉस्पिटलमधील गुन्ह्यासंदर्भात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या १८४ रुग्णांच्या फाईल ताब्यात घेतल्याचे पिंगळे यांनी सांगितले. आतापर्यंत यातील १७ रुग्णांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यातील ११ जणांनी रुग्णालयाकडून बिल न देता काही रक्कम आकारण्यात आल्याचे जबाब दिले आहेत. या गुन्ह्यातील चौघांच्या अंतरिम जामिनावर १४ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.