सांगली : टाईम आला आहे, कार्यक्रम करा, असा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्यानेच आम्ही महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची तयारी केली. दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक एकसंघपणे निवडणुकीला सामोरे गेल्याने यश आले. भाजपमधील नाराज पाच ते दहा नगरसेवक आमच्या संपर्कात असून महिन्याभरात आघाडीचे संख्याबळ ५० वर पोहोचेल असा दावा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली.
बजाज म्हणाले की, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने महापालिकेत करेक्ट कार्यक्रम झाला. ही तर एक सुरुवात आहे. दोन महिन्यात भाजपाचे आणखी नगरसेवक आघाडीत सामील होतील. भाजपाचे नेतृत्व पसंत नाही म्हणून नाराज सदस्यांनी दिग्विजयला मतदान केले. नवे पदाधिकारी या संधीचे सोने करतील. राज्यात सत्ता असल्याने नवीन योजनाही आणू. दोन्ही मंत्री आपलेच असल्याने त्याचा फायदा महापालिकेच्या विकासासाठी होईल, असे सांगितले.
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, अडीच वर्षातील भाजपाच्या कारभाराला त्यांच्याच नगरसेवकांनी कंटाळून विरोधी मतदान करुन चपराक मारली. आघाडीचे सर्व नेते यांनी एकदिलाने ही निवडणूक जिंकली. आता काँग्रेस आघाडीच्या सत्तेमुळे शहराचा समतोल विकास होईल. आमची जबाबदारी वाढली.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, भाजपच्या कारभारावर जनता नाराज होती. सात सदस्यांनी मदत केली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडून निधी आणून अडीच वर्षातील विकासाचा बॅकलाॅग भरून काढू असे सांगितले.
चौकट
--
काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणाले की, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निकालानंतर जनतेचा कौल दिसून आला होता. तेव्हापासूनच भाजपाचे नगरसेवक आमच्या संपर्कात होते. भाजपा विरोधात मतदान करणारे नगरसेवक हे मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांना भाजपाने आमिष दाखवून घेतले. भाजपाचे २० ते २२ नगरसेवक संपर्कात होते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळेच विरोधात मतदान झाले. राज्यात सत्ता असल्याने शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू, असे सांगितले.