विकास शहाशिराळा-अपघात होऊन सात दिवस ओघळात अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलणाऱ्या रूपेशची मृत्युशी झुंज अखेर मंगळवारी अकराव्या दिवशी अपयशी ठरली. त्याच्या जगण्यासाठी झटणाऱ्या सर्वांच्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला.रूपेश विष्णू कदम ( वय 2६ ) अमेणी पैकी खोंगेवाडी ( ता. शाहूवाडी ) येथील तरुण. तो ३० जानेवारी २०२१ रोजी कोकरूड येथे आला होता. त्याने आपल्या मामा सोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री घरी गेला नाही. तो दुसऱ्या दिवशी ही घरी न आल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी मामाकडे चौकशी केली असता तो त्याच रात्री परत घरी आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नसल्याने त्याच्या वडिलांनी तो कोकरूड येथून मोटरसायकलसह बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.१ फेब्रुवारीला कोकरुड पोलीस ठाण्यात दिली होती. शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तुरुकवाडी ( ता.शाहूवाडी) येथील सुभाष पाटील व विलास पाटील हे कालव्याचे पाणी शेतीला पाजण्यासाठी गेले होते. पण शेतात पाणी येत नसल्याने पाण्याच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण झाला आहे का हे पाहण्यासाठी फिरत होते. ते पाहत असताना त्यांना शाहीरवाडी येथील सनंदा शेताजवळ कोकरुड - ते तुरुकवाडी दरम्यानच्या मख्य रस्त्या लागत असणाऱ्या दहा फूट ओघळात विव्हळत व अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तरुण आढळून आला. त्यांच्या अंगा खालून पाणी जात होते.
पाण्याचा प्रवाह कमी असल्याने तो वाचला होता . सोबत मोटरसायकल होती. दरम्यान तरुण बेपत्ता असल्याची माहिती माध्यमाद्वारे सर्वत्र फ़िरत होती.त्यावरून तो रूपेश असल्याची खात्री पटली. त्यानंतर डॉ. नामदेव पाटील, युवराज पाटील , एकनाथ पाटील व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेतुन त्यास भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले . तिथून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . त्याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , भावजय , पुतण्या , दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे . त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .