सांगली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त जिल्हाभरात विविध ४ हजार ६६६ ठिकाणी कार्यक्रम आयोजित केेले असल्याची माहिती अभियान प्रमुख विशाल जोशी यांनी दिली.
दि. १५ ऑगस्ट रोजी विविध गावे, वाड्या, वस्त्या, सार्वजनिक ठिकाणी हे कार्यक्रम होतील. ध्वजारोहण, भारतमाता पूजन, तिरंगा फेरी, घराघरावर तिरंगा असे उपक्रम राबविले जातील. १० तालुके, महापालिका क्षेत्रासह १११ गावांमध्ये कार्यक्रम होतील. राष्ट्रीय कला मंचाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होतील. चित्रकला, रांगोळीसाठी रंगमाला, वाचन, कथा सादरीकरणासाठी शब्दगंध, नृत्य, गायनासाठी नटरंग असे कार्यक्रम होतील. अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजित केले आहेत.
जोशी यांनी आवाहन केले की, स्वातंत्र्यदिनी आयोजित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा. कामाच्या ठिकाणी अथवा घरी ध्वजारोहण व भारतमाता पूजन करावे. यासाठीच्या भारतमातेच्या प्रतिमा विद्यार्थी परिषदेच्या सांगली कार्यालयात उपलब्ध आहेत. यावेळी माधुरी लड्डा, तन्वी खाडीलकर आदी उपस्थित होते.