लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायासह प्रत्येक क्षेत्रात मराठीतून व्यवहार झाल्यास प्रसाराचे मोठे काम होऊ शकते. राज्य शासनाने सांगलीत मराठी भाषा विद्यापीठ उभे करावे, अशी मागणी शिवसेनेकडून शनिवारी करण्यात आली.
शनिवारी येथील गणेश मार्केटजवळील शिवसेना कार्यालयात संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. दीपक चव्हाण यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मराठी मातृभाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन चव्हाण यांनी सांगलीतील सर्व व्यापारी व उद्योजक यांनी मराठीत आपल्या दुकानाचे फलक लावावेत व सर्व व्यवहार मराठीतूनच केल्यास मराठी भाषेचा प्रसार चांगला होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तसेच सांगलीत मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र सरकारने स्थापन करावे, अशी मागणी केली.
या कार्यक्रमाला पंडितराव बोराडे, प्रसाद रिसवडे, लक्ष्मण वडर, जितेंद्र शहा, निर्मल बोथरा, मनोज कवठेकर, प्रकाश लवटे आदी उपस्थित होते.