सांगली : शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहत असला तरी, तो कायमस्वरूपी निकालात काढला जात नाही. परिणामी प्रत्येकवर्षी सहा हजारहून अधिक लोक मोकाट कुत्र्यांचे ‘लक्ष्य’ ठरत असल्याचे चित्र आहे. तसेच कुत्रे चावलेल्या रुग्णांवर लसीकरणासाठी महापालिका वर्षाकाठी १२ लाख रुपये खर्च करीत आहे. याशिवाय सांगलीचे शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वेगळीच आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या महिन्यात विश्रामबाग येथील उद्योग भवनच्यामागे प्रातर्विधीसाठी गेलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करुन तिला ठार मारले. या घटनेमुळे प्रत्येकजण हळहळला. या चिमुरडीचे कुटुंब उत्तर प्रदेशचे होते. महापालिका प्रशासनाकडून त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा होती. पण ती न मिळाल्याने हे कुटुंब गेल्या आठवड्यात आपल्या गावी परतले. आठवड्यापूर्वी संजयनगरमध्ये तीन लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. कुत्र्यांना पकडून ठार मारता येत नाही. त्यांची नसबंदी करण्यात आली, त्यांना पकडून अन्य ठिकाणी हलविण्यात आले, तरीही हा प्रश्न सुटलेला नाही. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या संख्येत वाढच होत आहे. रात्रीच्यावेळी ठराविक चौकात २० ते २५ कुत्र्यांची झुंड बसलेली असते. मुख्य रस्त्यावरही कुत्री बसलेली असतात. त्यांच्यासमोरून जाणे धोक्याचे ठरते. खाद्यपदार्थाचे अनेक हातगाडे सायंकाळी शहरात लागतात. या हातगाड्यांभोवती ही कुत्री बसलेली असतात. खरकटे, तसेच अन्य टाकाऊ पदार्थ या कुत्र्यांना खायला दिले जातात. महापालिकेच्या रुग्णालयात कुत्रे चावलेल्या रुग्णांना लस देण्यासाठी प्रत्येकवर्षी १२ ते १३ लाख रुपये खर्च करावा लागतो. याशिवाय कुत्री पकडण्यासाठी ठेकेदारालाही लाखो रुपये दिले जात आहेत. दररोज कुत्री पकडल्याची नोंद केली जात असेल, तर मग शहरात अजूनही कुत्री का दिसतात? कुत्री पकडून दुसरीकडे सोडून दिली जात असतील, तर ती परत कशी येतात? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. (प्रतिनिधी)
दरवर्षी ६ हजारजणांना श्वानदंश
By admin | Published: June 20, 2016 12:26 AM