सांगली : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगासाठी जिल्हास्तरावर २०१७ पासून कार्यक्रम साजरा करण्यात येत असून दरवर्षी त्याचा उत्साह व सहभाग वाढत आहे. दिव्यांग विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत यांनी केले.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डेक्क्न मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, अश्विनी पाटील, जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत म्हणाले, संविधानाच्या अनुच्छेदाप्रमाणे सर्व ठिकाणी दिव्यांगाना समान संधी उपलब्ध करून द्यावी. ते या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यास सक्षम आहेत. त्यांचा शास्वत विकास करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करून त्यांनी दिव्यांगाना शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी पूर्ण ताकदीने मदत करू असे आश्वासन दिले. तसेच शफीक खलीफा यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी दिव्यांग शाळा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर, सेवा जेष्ठता व प्रेरणा पुरस्काराचे वितरण तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार अनिलकुमार राजमाने, रोहन भंडारे, रुपाली शिंदे, शशिप्रिया पंडित व शकील नदाफ यांना देण्यात आला तर आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार शिवाजी कदम व साधना कोले यांना देण्यात आला.
दिव्यांग सेवा जेष्ठता व प्रेरणा पुरस्कार शफीक खलीफा, प्रेरणा पुरस्कार रामदास कोळी, कविता पाटील, आशा पाटील, सुहास पाटील व शितल दबडे यांना देण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी विशेष शिक्षक मारूती पाटील, विशेष शिक्षिका उषा पाटील, दिपक वाघमारे व सतिश गोंदकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले. आभार एस. बी. फडतरे यांनी मानले.यापूर्वी सकाळी 8 ते 9 या वेळेत वसंतदादा पाटील स्मारक (साखर कारखाना) ते डेक्कन मॅन्युफॅक्चर्स हॉल माधवनगर रोड, सांगली अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग शाळा, संघटना सहभागी झाल्या होत्या.