लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : आजी-माजी सैनिकांना सर्वांनी सन्मान देणे गरजेचे असून, त्यांच्याप्रती योग्य तो आदरभाव राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त सुभेदार मेजर व सांगली जिल्हा वाहतूक परिवहन निरीक्षक अनिल धुमाळ यांनी व्यक्त केले.
शिराळा येथे आजी-माजी सैनिक संघटना यांच्यावतीने आयोजित कारगील विजय दिनानिमित्त वीर जवान मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष सुनिता निकम, निवृत्त सुभेदार कॅप्टन रामचंद्र मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी वाहतूक निरीक्षक अनिल धुमाळ म्हणाले, ‘‘आजी-माजी सैनिक यांना समाजात वावरत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. समाज त्यांचा योग्य तो सन्मान करत नाही. सैनिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या असतील तर संघटनेच्या माध्यमातून कार्यरत रहावे. महाराष्ट्र सरकारने इतर राज्याप्रमाणे माजी सैनिकांना इतर सोई-सुविधा आणि आरक्षित जागा उपलब्ध करून द्याव्यात. अनेक जाचक अटींमुळे इच्छा असूनदेखील माजी सैनिक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. या सगळ्यांसाठी सैनिक संघटना यांच्यावतीने आवाज उठवणे गरजेचे आहे.
यावेळी स्वरा पाटील, अमृत पाटील, शंकर गायकवाड, ज्योर्तिलींग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास निवृत्त सुभेदार पांडुरंग शेळके, शिवाजी इंगवले, ब्रम्हदेव पाटील, वीरचक्र विजेते, मारुती नाकील यांच्या पत्नी हिराबाई नाकील, अनिता पाटील व मान्यवर उपस्थित होते.