सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौदा माजी संचालकांनी नाष्टा व वाहनावर बेकायदा खर्च केला होता. या प्रकरणातील अकराजणांनी ५ लाख ४० हजार रुपये मंगळवारी भरले. याबाबत बाजार समितीच्या प्रशासकांनी साडेआठ लाख रुपये बेकायदा खर्च केल्याचा ठपका बाजार समितीच्या माजी चौदा संचालकांवर ठेवला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील २००९-२०१३ मधील चौदा संचालकांनी वाहन व नाष्टा, चहापाण्यावर साडेआठ लाख रुपये खर्च केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले होते. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मनोहर माळी यांनी चौदाजणांची जबाबदारी निश्चित केली होती. यामधील राजेंद्र कुंभार, भारत डुबुले, विठ्ठल कोळेकर, दीपक लोंढे, बाळासाहेब बंडगर, मैनुद्दीन बागवान, रमेश बिराजदार, प्रकाश जमदाडे, महादेव अंकलगी, भारत कुंडले, भानुदास पाटील आदींनी त्यांच्यावर निश्चित केलेली ५ लाख ४० हजाराची अनियमितपणाची रक्कम मंगळवारी प्रशासकांकडे भरली. उर्वरित तिघे आता बाजार समितीचे मतदार नाहीत. त्यामुळे ते रक्कम भरण्याची शक्यता नाही. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीस पात्र राहण्यासाठी ही रक्कम माजी संचालकांना भरणे आवश्यक होते. ही रक्कम मंगळवारी भरली नसती, तर बुधवारी छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असता. (प्रतिनिधी)अर्जांची आज छाननी बाजार समिती निवडणुकीच्या १९ जागांसाठी ४६५ उमेदवारांनी ५३५ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची बुधवारी मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयात छाननी होणार आहे. त्यानंतर २२ जुलैपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. मतदान ८ आॅगस्टला होणार आहे.
माजी संचालकांनी भरले सव्वापाच लाख रुपये
By admin | Published: July 07, 2015 11:33 PM