कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास अर्ज भरण्यासाठी मदत करत आहे, या कारणावरून माजी उपनगराध्यक्ष अय्याज सय्यद मुल्ला यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यासह स्वीय सहायक खंडू होवाळे व आणखी पाच व्यक्तींवर शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात गुन्ह्य दाखल झाला आहे.कवठेमहांकाळ येथील दादा चौकातील मुल्ला यांच्या घरी ही मारहाणीची घटना शुक्रवारी (दि. २७) सकाळी घडली. सदर घटनेची फिर्याद अय्याज मुल्ला यांनी पोलिसांना दिली आहे. अय्याज मुल्ला यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केली. या वेळी मुल्ला यांचा मुलगा कैफ, पुतण्या एजाज, अनिस आणि आई हाजराबी यांना ढकलून खाली पाडले. तू भविष्यात जिवंत कसा राहतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मुल्ला यांनी फिर्यादीत म्हटले आहे.पोलिसात माजी खासदार संजय पाटील व स्वीय सहायक होवाळ यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनमध्ये सायंकाळी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर हे पुढील तपास करीत आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठिय्या आंदोलन..माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील हे कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात पोहोचले. माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन थांबवणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
अय्याज मुल्ला यांच्यावरही गुन्हाकवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या कारणावरून माजी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांना गुरुवारी रात्री शहरातील कुची कॉर्नर येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जीवाला धोका, संरक्षणाची मागणी..माजी खासदार संजय पाटील यांनी फोनवरून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माजी खासदारांकडून आमच्या व आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.