पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या पथकामार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गुलाबराव पाटील होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन यांच्यावतीने दहा दिवसात गृह विलगीकरणातील १५०० हून अधिक कोरोना रुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सहकार्याने १ मेपासून ही मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, गृह अलगीकरणातील रुग्णांसाठी ही तपासणी मोहीम आणि औषध वाटप स्वतःहून सुरू करण्यात आले आहे. त्याचा महापालिका क्षेत्रातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अखत्यारीतील रुग्णांना चांगला लाभ होताना दिसत आहे. ही मोहीम रुग्णांच्यादृष्टीने संजीवनी ठरत आहे.
रुग्ण आणि कुटुंबासाठी आम्ही ही सुविधा मिळवून दिली आहे. गुलाबराव पाटील हॉस्पिटलची ७० जणांची टीम त्यासाठी कार्यरत आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर येईपर्यंत ही तपासणी आणि उपचाराची मोहीम चालूच राहणार आहे.
पाटील म्हणाले, तपासणीत ताप, ऑक्सिजन स्तर, खोकला, सर्दी या गोष्टींची विचारपूस केली जाते. त्यांना रोगप्रतिबंधक औषधांचे कीट देण्यात येते. या रोगाविषयी जागृती करणारी माहिती दिली जाते. त्यामुळे त्यांना बरे होण्यासाठी खूप मोठी मदत होत आहे. त्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याचे योग्य मार्गदर्शन करते.
या उपक्रमाबाबत लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनात ही टीम मदतीला येते आणि सगळी चौकशी करून औषधे देऊन जाते म्हटल्यावर त्यांना खूप बरे वाटत आहे. या उपक्रमामुळे महापालिकेच्या यंत्रणेला मोठी मदत होत आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. येथील अनेक केंद्रांना त्यांनी भेट दिली आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये ही सेवा दिली जात आहे.