सांगली : २०१९ मधील पोलीस शिपाई पदासाठी आज, गुरुवारी जिल्ह्यातील ५८ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. १०५ पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी बुधवारी याचा आढावा घेत अधिकाऱ्यांनी परीक्षेबाबत सूचना दिल्या.
२०१९ मधील पोलीस शिपाई पदासाठी गुरुवारी लेखी परीक्षा होत आहे. महापालिका क्षेत्रासह आष्टा, हरिपूर, मालगाव, अंकली, माधवनगर, कवलापूर परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालय अशा ५८ केंद्रांवर परीक्षा होत आहेत. या परीक्षेसाठी १५ हजार ७३४ जणांनी अर्ज केला आहे.
परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी ५ उपअधीक्षक, २२ निरीक्षक, ७१ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ६६२ पोलीस कर्मचारी, ६२ महिला कर्मचारी असा एकूण ८२३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या पदासाठी एका जागेसाठी १० उमेदवार शारीरिक परीक्षेसाठी निवडण्यात येणार आहेत. परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारीपथक तयार करण्यात आले आहे.