पेठ-सुरूल ओढ्यामध्ये बेकायदेशीररीत्या विहीर उत्खनन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सुरूल (ता. वाळवा) येथील काही शेतकऱ्यांनी सुरूल-पेठ यादरम्यान असलेल्या ओढ्यामध्ये बेकायदेशीरीत्या उत्खनन केल्याची तक्रार सुरूल येथील शेतकरी राजाराम मानकू पाटील, दादासाहेब यशवंत पाटील, अशोक नामदेव पाटील यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे केली आहे. सदरच्या शेतकऱ्यांना तहसीलदार यांनी नोटीसही बजावल्याचे तलाठी एम. एन. गुुजर यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, सुरूल येथील संभाजी सदाशिव पाटील, पोपट बंडू पाटील, दिनकर महादेव पाटील (रा. सुरूल, ता. वाळवा) यांनी विनापरवानगी पेठ-सुरूलचा नैसर्गिक ओढा अडवून बेकायदेशीरपणे विहीर उत्खनन करण्याचे काम चालू केले आहे. या शेतकऱ्यांनी ओढ्याचे पाणी अर्जदारांच्या शेतातून काढल्याने तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार आहे. तरी या नुकसानीस कोण जबाबदार, असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. ही विहीर लॉकडऊनची वेळ साधूनच उत्खनन करण्याचे काम सुरू केले आहे, असे तक्रारदारांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.
कोट
सदर विहिरीची पाहणी केली. या कृत्रिम ओढ्यात बेकायदेशीरपणे विहीर काढली जात आहे. याची परवानगीही घेतलेली नाही. याचा सविस्तर अहवाल आपण तहसीलदार यांना सादर करणार आहोत.
-एम. एन. गुजर, तलाठी, सुरूल