लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका परमीटरुम बिअरबारच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच कार्यालय परिसरात स्वीकारत असताना उत्पादन शुल्क विभागाचा पोलीस निरीक्षक शहाजी आबा पाटील (५६) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. ही कारवाई मंगळवारी रात्री झाली.
लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे उत्पादक शुल्क खात्यात खळबळ उडाली होती. या घटनेतील तक्रारदाराचे कासेगाव येथे परमिटरुम बिअरबार आहे. त्याचा परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी शहाजी पाटील याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यावर तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात रितसर तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांच्या पथकाने मंगळवारी पेठ रस्त्यावरील प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी उत्पादन शुल्कचा निरीक्षक शहाजी पाटील हा १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.
या कारवाईत हवालदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, भास्कर भाेरे, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सीमा माने यांनी भाग घेतला.