लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : आटपाडी येथे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील यांच्या पुढाकाराने बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आटपाडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला.
बांधकाम कामगारांची नाेंदणी २०२० पासून ऑनलाइन पद्धतीने केली जाते. असे असले तरी रोजंदारीवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना ही नोंदणी करणे शक्य होत नाही. काही ठिकाणी अनेक नोंदणी करणाऱ्या एजंटांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. एजंट कामगारांना मिळत असलेल्या लाभापैकी ५० टक्के लाभ स्वतःसाठी घेतात. हे थांबवण्यासाठी अनिता पाटील यांनी मेळावा आयोजित करून कामगार वर्गास नोंदणीचे आवाहन केले हाेते.
या अनुषंगाने शनिवारी पंचायत समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बांधकाम कामगार नोंदणी सुरू करण्यात आली. यावेळी सुमारे २०० कामगारांची एकाच ठिकाणी नोंदणी करण्यात आली. कामगारांचे स्मार्ट कार्ड व सुरक्षा किट अनिता पाटील यांच्यामार्फत घरपोच दिले जाणार आहे.
यावेळी निवारा बांधकाम संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, विजय पाटील, सोमनाथ अडसूळ, राजेंद्र सावंत, वनिता फुले, सुनीता जाधव आदी उपस्थित होते.
चौकट
स्थापत्य अभियंता या नात्याने बांधकाम कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे मी माझे कर्तव्य समजते. कामगारांना एजंटच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा हा एक प्रयत्न आहे. नोंदणी केलेल्या कामगारांना त्यांचे स्मार्ट कार्ड व सुरक्षा किट पोहाेच केले जाईल. शासनाचे आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होतील.
- अनिता पाटील स्थापत्य अभियंता