ओळ : जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना प्रा. शामराव पाटील, खंडेराव जाधव, भूषण शहा, रणजित गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक पाटील
इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातील उत्साह आता निवळला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूरसह शिराळा मतदारसंघात जयंत पाटील यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. याचवेळी कार्यकर्त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. त्यांनी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटर जाहीर केल्यानंतर मतदारसंघातील होणाऱ्या कार्यक्रमांवर कोरोनाचे सावट पसरले.
राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात दौरा सुरू केला होता. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध कार्यक्रमांना त्यांचे पुत्र, युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित राहून जयंत पाटील यांची उणीव भरून काढत होते.
दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचा वाढदिवस आरोग्य आणि सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन राष्ट्रवादीकडून केले होते. स्वत: जयंत पाटील यांनी १५ फेब्रुवारी रोजी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघासह सांगली शहरात विविध कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शविली. सायंकाळी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कबड्डी लीगचे उद्घाटन करून ते मुंबईला रवाना झाले. १६ व १७ फेब्रुवारीला दिवसभर मुंबई येथील विविध कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर १८ रोजी जयंत पाटील यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी मतदारसंघात येऊन धडकली. त्यामुळे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांतील उत्साह निवळला असल्याचे दिसले. त्यांच्या काही समर्थकांनी स्वत:चा वाढदिवसही साजरा केला नाही.
चाैकट
लग्न समारंभावरही सावट
एकंदरीत मतदारसंघातील होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांवर कोरोनाचे सावट पसरले आहे. तर काही कार्यकर्त्यांनी घरातील लग्नाच्या तारखा जयंत पाटील यांच्या सोयीनुसार घेतल्या होत्या. परंतु आता लग्न समारंभातही ५०हून अधिक पाहुणे उपस्थित राहणार नसल्याने या समारंभावर कोरोनाचे सावट पसरले आहे.