फोटो : इस्लामपूर येथे ऑनलाइन कोरोना साक्षर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर.
इस्लामपूर : लोकमत बालविकास मंचतर्फे सर्व बालचमूंसाठी मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक आणि व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्याच्या कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे ‘लोकमत बालविकास मंच’ आणि परीक्षित फाउंडेशन इस्लामपूर, राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ऑनलाइन कोरोना साक्षर चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा प्रशासनामार्फत लावण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करीत पार पडला.
या स्पर्धेमध्ये ७५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी पुढील चार विभागांत गट अ-पहिली ते दुसरी, गट ब-तिसरी ते चौथी, गट क -पाचवी ते सातवी, गट ड-आठवी ते दहावी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक विभागात तीन क्रमांक काढले गेले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदीप कोडग, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, चित्रकार अन्वर हुसेन पट्टेकरी उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रायोजक अर्णव डिस्टिब्युटर्सचे प्रा. सी. जे. भारसकळे, संध्या फोटो स्टुडिओचे राजू खरात, धुळा ट्रान्सपोर्टचे सिद्धाराम धुळा, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य व शिवशक्ती ई-मोटर्स अँड इंजिनिअर्सचे सुनील तावटे, कलाशिक्षक मानसिंग जाधव, किरण माने, सूरज जंगम, योगेश शिनगारे, शंकर जावळे, सुदर्शन माळी, विशाल पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. राजेश दांडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शन परीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील कुंभार यांनी आभार मानले.