सांगली अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगलीः सांगली अर्बन को-ऑप. बँकेची ८४ वी वार्षिक सभा डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. गेल्या पाच वर्षात बँकेच्या ठेवीत ३०० कोटीची भर पडली असून एकूण उलाढाल १८४० कोटीपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव व शासनाच्या नवीन आदेशास अनुसरुन सभासदांना या सभेस समक्ष उपस्थित राहता येणार नसल्याने ही सभा ऑनलाईन घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीस सभासदांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. राज्य सहकारी बोर्डाचे प्रा. बुधले यांनी ९७ व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने क्रियाशील सभासद होणेसाठी लागणाऱ्या प्रमुख मुद्यांची माहिती करुन दिली.
बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी दि. ३१ मार्च २०२० अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाची तसेच गेल्या ५ वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, बँकेचे भागभांडवल ३६ कोटी असून ठेवी ११७७ कोटी आहेत. बँकेने ६६३ कोटीचे कर्जवाटप केले आहे. प्रति कर्मचारी उत्पादकताही ५.३० कोटी इतकी वाढली आहे. पाच वर्षापूर्वी बँकेचे केवळ एकच एटीएम होते. आता त्यांची संख्या ८ झाली आहे.
विषय पत्रिकेवरील सर्वच विषय मंजूर झाले. ज्या सभासदांनी लेखी प्रश्न बँकेकडे दिले होते. ते प्रश्न सभेपुढे वाचून दाखविण्यात आले व त्याचीही उत्तरे दिली. तसेच ऑनलाईन प्रणालीमधून २१ सभासदांनी प्रश्न विचारले. यावेळी ऑनलाईन सभेत ३०३ सभासदांनी भाग घेतला. अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी स्वागत केले तर संचालक संजय धामणगावकर यांनी आभार मानले. शैलेंद्र तेलंग यांनी पसायदान सादर केले. यावेळी उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, संचालक अनंत मानवी, श्रीकांत देशपांडे, सई मंद्रूपकर, संजय पाटील, संजय धामणगावकर, संजय परमणे, शैलेंद्र तेलंग, सागर घोंगडे, अरविंद कोरडे, अॅड. रणजित चव्हाण, श्रीपाद खिरे आदी संचालक उपस्थित होते.