सांगली : ग्रीस येथे दिनांक 20 जुलै 2019 रोजी होणाऱ्या 44 कि.मी. हील मॅरेथान मध्ये सहभागी होण्यासाठी टेंभू उपसा सिंचन विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे चे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना झाले.ग्रीस येथे होणारी 44 कि.मी. अंतराची स्पर्धा ही नॉर्थ फसे, अल्ट्रा ट्रेल माउंट ब्लॅक या प्रकाराची असून सर्वात खडतर डोंगर उतरावरून धावणे या प्रकाराची आहे. साधारणपणे समुद्र सपाटीपासून 2 हजार मीटर उंचीवर ही स्पर्धा झागोरी ग्रीस या शहरात होणार आहे. एकूण 44 कि.मी. अंतरामध्ये साधारणपणे 2100 मीटर उंची पार करावयाची आहे.रेड्डीयार यांची अखिल भारतीय नागरी सेवा मैदानी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झालेली आहे. अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा 2018 व 2019 या मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे महाराष्ट्र राज्य संघाकडून प्रतिनिधीत्व करून यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
यापूर्वीही रेड्डीयार यांनी धावणे या क्रीडा प्रकारामध्ये विविध राष्ट्रीय तसेच इटली, सिंगापूर, दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेवून चांगली कामगिरी केलेली आहे. शासकीय सेवा बजावत असताना त्यांची धावणे या क्रीडाप्रकारात आवड व ते नियमितपणे सराव करीत असून भविष्यामध्येही विविध राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा व चांगली कामगिरी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.