सांगली : कोरोना आपत्ती निवारण कार्यात दीड वर्ष शिक्षक काम करीत आहेत. आता शिक्षण सेवकांना कोरोना कामकाजातून वगळण्यात यावे, या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत शिक्षण सेवकांना कोरोना कर्तव्यातून सूट दिली आहे, अशी माहिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, शिक्षण सेवकांना कामातून मुक्त करावे, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनासह शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे केली होती. निवेदनात म्हटले होते की, शिक्षण सेवकांना संसर्ग झाला किंवा शिक्षण सेवकांचा कोरोनाने मृत्यू झाला तर ते शासनाचे नियमित कर्मचारी नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक लाभ किंवा विमा संरक्षण दिले जात नाही. वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण सेवकांना कोरोना कार्यातून वगळण्यात आले आहे. अन्य जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्हा परिषदेनेही शिक्षण सेवकांना कोरोना कामातून मुक्त करावे.
त्यानुसार शिक्षणाधिकारी कांबळे यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकाऱ्यांना तसे लेखी पत्र दिले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल माने, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे उपस्थित होते.