संतोष भिसेसांगली : रणरणत्या उन्हात निवडणूक प्रचाराचे आव्हान पेलताना उमेदवारांची सारी भिस्त कार्यकर्त्यांवर आहे. मतदारांना सांभाळतानाच कार्यकर्त्यांची मर्जीही जपावी लागत आहे. जितकी गर्दी जास्त, तितकी जिंकण्याची हमी जास्त अशा भूमिकेतून लोक जमविण्यासाठी उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे.गेल्या आठवड्यापर्यंत काहीशी निरस असणारी सांगलीची निवडणूक आता भलतीच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यावर उमेदवारांचा भर दिसत आहे. गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणी झालेल्या सभा, पदयात्रा, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची गर्दी यामधून कार्यकर्त्यांना जपण्यासाठीची उमेदवारांची आणि नेत्यांची धडपड दिसून आली.उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत पोहोचत असताना राजकीय हवादेखील भलतीच गरम होऊ लागली आहे. अशा उन्हात गर्दी जमवणे म्हणजे मोठे आव्हान ठरत आहे. सांगलीतून रॅली काढताना गर्दी दिसण्यासाठी काहींनी भलतीच गंमत केली. सभास्थळापर्यंत सोबतीला असणारे तथाकथित कार्यकर्ते सभा सुरू होताना मात्र दिसेना झाले. इकडे-तिकडे पाहिले असता ते उन्हापासून बचावासाठी कडेला झाडांच्या आडोशाला जाऊन बसल्याचे दिसले. काहींनी जवळच्या बाटल्या रिकाम्या करायला सुरुवात केली होती, तर काहीजण गाड्यावरच्या कुल्फीचा आस्वाद घेत होते.
दुपारच्या एका सभेला उमेदवार व्यासपीठावरून कंठशोष करीत होता, तर कार्यकर्ते बाजूला एका मैदानात शाकाहारी बिर्याणीवर ताव मारत होते. दमलेल्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारानेच ही व्यवस्था केली होती; पण त्यांनी सभेला थांबायचे सोडून पोटपूजेला प्राधान्य दिले.
भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी पार्सल..निवडणुकीने रोजगारही द्यायला सुरुवात केली असून महिलांना चार तासांच्या रॅलीत सहभागासाठी ३०० ते ४०० रुपयांपर्यंत पैसे मिळत असल्याचे बोलले जातेय. त्याशिवाय घरापासून प्रवासासाठी वाहन, पाण्याची बाटली, डोक्यावर सावलीसाठी टोपी आणि रॅली संपल्यानंतर जेवणाचे पार्सल अशी सेवा उमेदवाराला करावी लागत आहे. सभेनंतर जेवणाची शिल्लक पाकिटे घराकडे नेण्याचीही चैन होत आहे.
क्लास वन अन् फोर कार्यकर्ते..उमेदवार व्यासपीठावर, पहिल्या श्रेणीतले कार्यकर्ते मोटारीच्या एसीमध्ये आणि सर्वसामान्य कार्यकर्ते शेजारी टपरीच्या सावलीला असे एकूण सभांचे चित्र पाहायला मिळत आहे. मोटारीतले कार्यकर्ते शीतपेयाच्या बाटल्या रिचवताना सामान्य कार्यकर्ते मात्र बर्फाचे गोळे, कुल्फी, रुपयाभराची पेप्सी, १० रुपयांचा मठ्ठा अशांवर रणरणत्या उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत.