फोटो ओळ : पेठ (ता. वाळवा) येथे डॉ. अतुल भोसले, जगदिश जगताप यांच्याहस्ते वाकुर्डे योजनेच्या थकीत बिलाचा धनादेश अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी दयानंद पाटील, धोंडिराम जाधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, वाकुर्डे योजनेच्या थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्वरित थकीत वीजबिलापोटी ४ लाख २९ हजार ६३२ रुपयांचा धनादेश पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
या थकीत वीजबिलापोटी कृष्णा कारखान्याने आजअखेर १५ लाख ८० हजार ५५४ रुपये भरत, या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या योजनेचे वीजबिल थकीत असल्याने २०१८ मध्ये या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकऱ्यांनी ही रक्कम भरली नव्हती. त्यामुळे वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत योग्य तोडगा काढावा, अशी मागणी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर करून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता.
दरम्यान, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ लाख १९ हजार रुपये, तसेच दुसऱ्या टप्प्यात ३ लाख ३१ हजार ९२२ रुपये भरले होते. यापैकी उर्वरित ४ लाख २९ हजार ६३२ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.