सांगली : सौद्यावेळी होणारी बेदाण्याची नासाडी, पैसे मिळण्याचा कालावधी, पेटीच्या किमतीची वसुली या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि बेदाणा व्यवहारात व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पणन राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख सहा बाजार समित्यांची बैठक सांगलीत आयोजित करण्याचा निर्णय गुरुवारी येथील बैठकीत घेण्यात आला. सौद्यावेळी नमुना पाहताना बेदाण्याची नासाडी टाळण्यासाठी ही घट अर्धा किलो ग्राह्य धरण्यात यावी, या मागणीवर पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.बेदाणा सौद्यामधील अडचणींवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याच्यादृष्टीने गुरुवारी येथील बाजार समितीत सांगली, तासगाव, पंढरपूर व सोलापूर बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे म्हणाले की, बेदाण्याच्या व्यवहारांमध्ये अडचणी येत असून, त्याचा शेतकऱ्यांना तोटा होतो, सौद्यावेळी नमुना पाहताना बेदाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते, त्यामुळे वजनात घट होत असल्याने ही घट ५०० ग्रॅम धरावी. शेतकरी आणि खरेदीदार या दोघांकडूनही बेदाण्याच्या पेटीची अर्धी-अर्धी किंमत घेणे अपेक्षित आहे. सध्या सांगली व तासगाव बाजार समित्यांत ‘बॅन पद्धत’ अमलात आली आहे. बेदाण्याचे पैसे २१ दिवसांत न देणाऱ्या व्यापाऱ्यांवर ‘बॅन’ आणला जातो. अशीच पद्धत पंढरपूर व सोलापूर येथेही अमलात आणावी. तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील म्हणाले की, बेदाणा पेटीच्या किमतीच्या मुद्द्यावर आणि शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळण्याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. बेदाण्याचा खप वाढविण्यासाठीही प्रयत्न व्हावेत. शेतकऱ्यांनी उच्च प्रतीचा माल उत्पादित केला, तर चांगला दर मिळू शकेल. काही शेतकरी बाजार समितीबाहेर बेदाणा विकतात, त्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तोडगा आवश्यक आहे. सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील म्हणाले की, बाजार समितीच्या आवारातच बेदाणा विक्रीस आणावा यासाठी प्रबोधन व्हावे. सांगली व तासगाव या दोन बाजार समित्यांमध्ये बेदाण्याची दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. हा व्यवहार जर आवाराबाहेर झाला, तर त्यावर नियंत्रण राहणार नसून, त्यात शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे.यावेळी उपसभापती जीवन पाटील, वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील, दयगोंडा बिरादार, तानाजी पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, प्रशांत शेजाळ, उमेश पाटील, दादासाहेब कोळेकर, बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील, गुलाबराव यादव, सचिन पाटील, निशांत माने, प्रशांत भोसले, भीमराव पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो : २१एसएन १सांगलीत गुरुवारी बेदाणा सौद्यातील अडचणींबाबत बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी चर्चेत डावीकडून तासगाव बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, सांगली बाजार समितीचे सभापती संतोष पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, प्रकाश पाटील यांनी सहभाग घेतला.सहा बाजार समित्यांची सांगलीत बैठक होणारबेदाणा व्यवहारात येणाऱ्या अडचणी व त्यावर तोडगा काढण्यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सांगली, तासगाव, पंढरपूर, सोलापूर, नाशिक आणि पिंपळगाव बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक सांगलीत आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत बेदाण्याच्या पैशांची देयके, होणारी नासधूस याबरोबरच बाजार समितीच्या आवाराबाहेर होणारे व्यवहार रोखण्यासाठी निश्चित उपाययोजनांबाबत चर्चा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येत्या पंधरवड्यात ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
बेदाणाप्रश्नी सांगलीत लवकरच बैठक
By admin | Published: July 22, 2016 12:06 AM