अशोक पाटील ।इस्लामपूर : वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. गेल्या १0 वर्षांची अवस्था पाहता, कार्यकर्ते तर सोडाच, पण नेत्यांचीही वानवा आहे. जे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेते आहेत, तेही फक्त पदापुरतेच आहेत. हातकणंगलेच्या मैदानात राजू शेट्टी, धैर्यशील माने यांची एन्ट्री झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही तयारीत होते, त्यामुळे तेही चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही.
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ताकद अबाधित आहे. त्यांनी काँग्रेसला कधीच उर्जितावस्था येऊ दिली नाही. उलट त्यांचा वापरच करुन घेतला आहे. आता तर काँग्रेस—राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांची आघाडी झाल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील, जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस प्रभारी अध्यक्षा अॅड. मनीषा रोटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील केवळ पदापुरतेच आहेत. काँग्रेसने जाहीर केलेली आंदोलने करण्यापुरतेच हे चेहरे रस्त्यावर दिसतात. आघाडी झाल्यामुळे या सर्व काँग्रेसजनांना स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि आ. जयंत पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे.
वाळव्यापेक्षा जरा बरी स्थिती शिराळा मतदारसंघाची आहे. येथे विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे. परंतु दोन्ही काँग्रेसच्या राज्य पातळीवरील निर्णयामुळे या मतदार संघात काँग्रेसला कधीच उभारी मिळालेली नाही. आता तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांच्या एन्ट्रीने मतांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. यामुळे याही मतदार संघात काँग्रेसची ताकद कमीच होण्याचे संकेत मिळत आहेत.