अशोक डोंबाळेसांगली : जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचा आराखडा दोन दिवसात राज्य शासनाकडे देण्यात येणार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत योजनेस मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.दुष्काळी भागासाठीच्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ गावांपैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. तेथे योजनेची ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर पूर्व भागातील ६५ गावांना पाणी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तयार केला होता; परंतु मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच त्यांचे सरकार गेल्यामुळे प्रक्रिया ठप्प झाली होती. जत पूर्वभागातील गावांच्या उठावानंतर या योजनेच्या मंजुरी प्रक्रियेला पुन्हा गती मिळाली आहे.विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेला दि. २० डिसेंबरपर्यंत मंजुरी देऊन प्रत्यक्षात कामाचे उद्घाटन ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने त्यांनी शासकीय यंत्रणेला तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव तयार असून दोन दिवसात तो राज्य शासनाकडे सादर होणार आहे, असे सांगण्यात आले. प्रस्तावित खर्च १९२८ कोटीचा असून हा निधी जागतिक बँकेकडून मिळणार आहे.
अशी असणार योजना
- जत पूर्व भागातील ६५ गावांसाठी १९२८ कोटी रुपये प्रस्तावित खर्च
- पन्नास हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
- बेडगपासून ५७ किलोमीटरच्या पूर्ण बंदिस्त पाईपद्वारे पाणीपुरवठा
- बेडग-म्हैसाळ ११.७० किलोमीटर लांब मुख्य जलवाहिनीतून पाणी उपसा
- पंपगृह, वितरण हौदासाठीचे किरकोळ भूसंपादन करावे लागणार
- योजनेसाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध
असे पोहोचणार मल्ल्याळपर्यंत पाणीयोजनेत सध्याच्या म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन बेडगमधून तीन टप्प्यात १८० मीटर इतक्या उंचीवर पाणी नेले जाईल. बेडग ते बसाप्पाचीवाडी नाला, बसाप्पाचीवाडीत ते मिरवाड तलाव आणि मिरवाड तलाव ते मल्ल्याळ (ता. जत) असे तीन टप्पे असतील. मल्ल्याळ डोंगरावरून नैसर्गिक उताराने हे पाणी जत तालुक्यातील कोसारी ते उमदी परिसरातील सर्व गावांना दिले जाणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार योजनेचा प्रस्ताव तयार आहे. प्रस्तावित खर्च १९२८ कोटी रुपयांचा आहे. तीन टप्प्यात पाणी उचलून ते मल्ल्याळ येथून नैसर्गिक उताराने वंचित ६५ गावांना पाणी देण्यात येणार आहे. दोन दिवसात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. - महेश रासनकर, कार्यकारी अभियंता, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग.