लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : करुंगली (ता. शिराळा) येथील शेतकरी शामराव रावजी पाटील यांनी त्यांच्या शेतात खोडवा पद्धतीने उन्हाळी भात पीक घेतले आहे. पाटील यांच्या या यशस्वी प्रयोगाने भात हे कोणत्याही हंगामात येणारे पीक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
शामराव पाटील हे आपली शेती आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. इतर शेतकऱ्यांच्याप्रमाणे पावसाळ्यात त्यांनी लागण पद्धतीने भात पीक केले होते. खरीप हंगामात म्हणजे पावसाळ्यात कापणी केलेल्या भात पिकाचे त्यांनी परत उन्हाळी खोडवा पद्धतीने भात पीक घेण्याचे ठरविले.
पावसाळ्यात त्यांना याच चार गुंठ्याच्या क्षेत्रात पाच मण (५ पोती) भात घेतले होते. आता खोडवा पद्धतीने केलेले उन्हाळी भात पीक देखील चांगलेच तरारून आले आहे. हे भात पीक परिसरातील शेतकऱ्यांचे सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी या पिकास पाणी व दोन-तीनवेळा खतेे दिली आहेत. सध्या हे भात पीक कापणीस आले असून, कमीत कमी चार ते पाच मण भात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोट
उन्हाळी भात पीक घेताना जंगली पक्षी मोर, लांडोर यांच्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी शेतीची राखण करावी लागत असली,तरी पहिल्यांदाच उन्हाळी खोडवा पध्दतीने केलेला भात शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने समाधान वाटत आहे. चांदोली परिसरात वर्षातून एकवेळेस पावसाळी भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रयोगामुळे नवी ऊर्जा मिळेल.
- शामराव पाटील, शेतकरी, करुंगली.