सांगली : आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार असून, काँग्रेसमध्येच आहोत आणि राहू, असे स्पष्टीकरण आ. विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिले.आ. कदम आणि देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्यानंतर जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे. विश्वजित कदम विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार असून, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. वडील दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आहे. कदम यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख दोनच दिवसांपूर्वी भाजपकडून विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.‘लोकमत’शी बोलताना कदम म्हणाले की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त निराधार आहे. त्यात तथ्य नाही. असे वृत्त पसरवण्यात कोणाचा हात आहे, हे शोधावे लागेल. युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी प्रदेशाध्यक्ष असताना केलेले कामपाहून भाजपने माझ्याबाबतही तसेप्रयत्न चालवले असावेत. मात्र मी काँग्रेसमध्येच आहे.शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसकडून संधी मिळाली तरच ती घेणार होतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडीतील राजू शेट्टी यांच्यासाठी ताकदीने काम केले होते. भविष्यातही काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे सत्यजित देशमुख यांनी सांगितले.
भाजप प्रवेशाचे वृत्त निराधार, आमदार विश्वजित कदम, सत्यजित देशमुख यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:09 AM