लोकमत न्यूज नेटवर्क
संख : खैराव (ता. जत) येथील सुनीता बाळवंत ढगे यांच्या घरी अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. स्फोट होऊन पाच लाखांचे नुकसान झाले. यामध्ये रोख एक लाख ७५ हजार, पाच तोळे सोने, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराला घडली.
घटनास्थळी गॅस कंपनीचे अधिकारी, तलाठी एन. यू वाघमोडे, कोतवाल बाळासाहेब चव्हाण यांनी भेट देऊन पंचनामा केला. खैरावपासून हुन्नूर रस्त्यावर अर्धा किलोमीटरवर गायरान जागेत सुनीता ढगे कुटुंबासोबत राहतात. सकाळी त्या जेवण करून शेतात खुरपण्याच्या कामाला गेल्या होत्या. त्यावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज लांब अंतरापर्यंत ऐकायला मिळाला. आवाज ऐकून शेजारील लोकांनी घराकडे धाव घेतली; परंतु घराने पेट घेतला होता. आग विझवता आली नाही. पत्रे इतरत्र उडून गेले.
आगीत घरातील रोख १ लाख ७५ हजार, दोन तोळ्यांची बोरमाळ, तीन तोळे हार, धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी पोलीस पाटील कांताबाई पाटील, सरपंच राजाराम घुटुगडे, हरिभाऊ दुधाळ, उपसरपंच रामचंद्र दुधाळ यांनी भेट देऊन आपद्ग्रस्तांना धीर दिला.
चौकट
भिशी फुटली, पैसे जळाले
सुनीता ढगे यांची दोन्ही मुले मुंबईला कंटनेरवर चालक आहेत. त्यांनी मुंबईत भिशीत पैसे गुंतविले होते. त्यामध्ये गुंतविलेले पावणेदोन लाख रुपये मोठा मुलगा दीपक ढगे यांनी लहान भावाच्या लग्नासाठी, घरगुती खर्चासाठी आणले होते. ती रक्कम आगीत जळून खाक झाली.