सांगली : कर्नाटकातून येणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांचा सांगलीरेल्वे स्टेशनपर्यंत विस्तार केल्यास या गाड्या मिरज जंक्शनला लवकर पोहोचू शकतात. त्याचप्रमाणे विश्रामबाग व सांगली येथील प्रवाशांची यामुळे सोय होईल. त्यामुळे या विस्ताराचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. दिलीप पटवर्धन यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेचा हुबळी विभाग तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई व पुणे विभागाकडे केली आहे.पत्रामध्ये म्हटले आहे की, सध्या कर्नाटकातून येणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस ही गाडी बेळगाव, गोकाक, घटप्रभा, चिंचली, रायबाग, चिकोडी, शेडबाळ, उगारखुर्द येथील प्रवाशांना घेऊन सांगली रेल्वे स्टेशनपर्यंत रोज येत आहे. इतर वेळेला येणाऱ्या पाच रेल्वे गाड्या फक्त मिरजपर्यंत येतात आणि त्यातही त्या गाड्या विजयनगर (म्हैसाळ) ते मिरजदरम्यान एक तास वेळ खातात.विजयनगर (म्हैसाळ) रेल्वे स्टेशनपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मिरज रेल्वे स्टेशनपर्यंत येण्यासाठी या गाड्या ४० मिनिटे ते एक तासाचा वेळ घेत आहेत. बैलगाडी किंवा सायकलच्या वेगाने या गाड्या या दोन स्टेशनच्या दरम्यान धावतात. त्यानंतर मिरजेला उतरून रिक्षा पकडून सांगलीला येण्यासाठी प्रवाशांना ४० मिनिटांचा वेळ जातो. म्हणजे एकूण दीड ते दोन तास प्रवाशांचे वाया जातात.काही रेल्वे तज्ज्ञांच्या मते मिरज जंक्शनवर गाड्यांची वर्दळ जास्त असल्यामुळे कर्नाटकच्या गाड्यांना मिरजेत येऊन दोन ते तीन तास थांबण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो. त्यामुळे या गाड्या शेडबाळ, उगार, विजयनगर येथे थांबवून ठेवल्या जातात. प्रवासी संघटनांनी यावर उपाय शोधून काढला आहे. या पाच गाड्यांना उगार, शेडबाळ, विजयनगरला एक तास न थांबवता थेट मिरजला दहा मिनिटात पोहोचवायच्या. मिरजेत पाच मिनिटांचा थांबा घेऊन पुढे सांगलीकडे पाठवायचे.
विश्रामबागला दोन मिनिटांचा थांबा द्यावा. त्यानंतर सांगली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर थांबवावे. सांगलीतून परत या गाड्या विश्रामबाग व मिरज येथे थांबून त्यांच्या निर्धारित वेळेत कर्नाटकात जाऊ शकतात.
प्रवाशांचीही सोयसांगलीपर्यंत रेल्वेचा विस्तार केल्यामुळे कर्नाटकातून येणारे प्रवासी मिरज जंक्शनवर लवकर पोहचतील. त्याचप्रमाणे सांगलीपर्यंतही काहींना जाता येईल.
सांगली स्थानकावर पाच प्लॅटफॉर्मसांगली रेल्वे स्टेशनवर एकूण पाच प्रवासी प्लॅटफॉर्म असून, हे प्लॅटफॉर्म दिवसभर मोकळे असतात. त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास कर्नाटकातून येणाऱ्या रेल्वे गाड्या सांगलीपर्यंत येऊ शकतील व विजयनगर येथे ताटकळत बसावे लागणार नाही.