भिलवडी : शासनाने सकाळी सात ते अकरा या वेळेत कृषी सेवा केंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. पण खरीप हंगामाचा विचार करता दोन तास वेळ वाढवून द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.
शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली असून जवळपास पंधरा-वीस दिवस बंद असणारी कृषी सेवा केंद्रे उघडली गेली. परंतु ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके व टॉनिक मुबलक प्रमाणावर उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यास जावे लागत आहे. आधीच भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. ऊसाला लागणारे पावसाळी डोस तसेच फवारणीसाठी लागणारे मायक्रो न्यूटन व टॉनिक वेळेत मिळणे गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून या जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी लक्ष घालावे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा दोन तास वेळ वाढवून द्यावा. केंद्र सरकारने खताच्या किमतीमध्ये केलेली भरमसाठ वाढ तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी २० मे रोजी आंदोलन जाहीर केलेले आहे. यादिवशी सोशल डिस्टंन्सिंग पळून पुतळा दहन करून निषेध करणार आहे, असेही राजोबा यांनी सांगितले.