कोल्हापुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी निवेदन दिले, यावेळी महेश चौगुले, राजू रसाळ, राजू जाधव, वसंत देवडा आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ऑटो रिक्षांच्या वैधता दाखल्यांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी सांगली, सातारा व कोल्हापूरच्या रिक्षा संघटनांनी केली आहे. तसे निवेदन कोल्हापुरात विभागीय उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
रिक्षा संघटनांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोनाने थैमान घातले असल्याने रिक्षाचालकांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. कुटुंबासह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन शिथिल होऊन सात-आठ महिने झाले तरी व्यवसायाचा सूर सापडलेला नाही.
त्यामुळे रिक्षांच्या वैधता कागदपत्रांसाठी जूनपर्यंतची म्हणजे तीन महिन्यांची मुदत योग्य नाही, त्याऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी. मोटर वाहन गटातील ऑटो रिक्षा वाहनाचे वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास दररोज ५० रुपये दंड आकारू नये.
निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी रिक्षा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक खतीब, अरिफ शेख, मोहसीन पठाण, संभाजी ब्रिगेड रिक्षा संघटनेचे शिवाजी जाधव, रशीद शेख, राजू जाधव, विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायतीचे राजू रसाळ, प्रकाश चव्हाण, अजित नाईक, सुखदेव कोळी, शाहीर फडतरे, संताजी ठोंबरे, इचलकरंजीतून महाराष्ट्र रिक्षा संघटनेच्या नंदाताई साळुंके, रामचंद्र जाधव, मोहन भिसे, सुनील गायकवाड, अल्ताफ शेख, राजाराम माळगे, कोल्हापूर रिक्षा युनियन संघर्ष समितीचे राजू जाधव, सुभाष शेट्टी, महादेव विभुते, शिवाजी पाटील, कराड रिक्षा संघटनेचे वसंत देवडा, इम्रान बागवान, शौकत बागवान, सातारा रिक्षा संघटनेचे अशोक खैरमोडे, अय्याज शेख यांचा समावेश होता.
चौकट
रेल्वे, बस बंदचा फटका
रिक्षा व्यवसाय इतर मोठ्या प्रवासी वाहतुकीवर म्हणजे रेल्वे, बस, लक्झरी यांच्यावर अवलंबून आहे. त्यापैकी रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होऊन एक वर्ष झाले आहे. मोजक्याच एक्सप्रेस रेल्वे व लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. याचा मोठा दुष्परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे.