सांगली : रिक्षांची वैधता परवान्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील रिक्षा संघटनांनी पाठपुरावा केला होता.
गेली दीड वर्ष लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद असल्याने संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. यापूर्वीच्या आदेशानुसार कागदपत्रांची वैधता व फिटनेस तपासणीची अंतिम मुदत ३० जूनअखेर होती. संघटनांनी ३१ डिसेंबरअखेर मुदतवाढ मागितली होती. तसेच मोटर वाहन संवर्गातील रिक्षा वाहनांच्या वाढीव नोंदणी शुल्क व फिटनेस विलंबास रोज ५० रुपये दंड आकारू नये, अशीही विनंती केली होती. कोरोना साथीमध्ये व्यवसाय बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत कागदपत्रे नूतनीकरणाची सक्ती करू नये अशी विनंती संघटनांनी केली होती. याची दखल घेत शासनाने ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. पॅगो प्रवासी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश चौगुले यांनी ही माहिती दिली.