वांगी : कृष्णा सहकारी साखर कारखाना सक्षमपणाने चालविण्यासाठी रयत पॅनेलच्या मागे ठाम उभे राहा. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या काळात सभासदांना न्याय देऊन उसास उच्चांकी दर दिला होता, पण तेथे आता इतर लोक शिरले आहेत. त्यांनी कारखान्यात मक्तेदारी निर्माण केली असून सभासदांची पिळवणूक सुरू केली असल्याची टीका कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
रयत पॅनेलच्या प्रचारार्थ वांगी, हिंगणगाव खुर्द, शेळकबाव, शिरगाव, रामपूरमधील बैठकीत ते बोलत होते. यावेळी दिग्विजय कदम, उमेदवार संजय पाटील, बापूसाहेब मोरे आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखान्याची निर्मिती केली, सभासद कारखान्याचा मालक आहे, या विचाराने त्यांनी कामकाज केले. त्यांचे अनुकरण करत डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखान्याचा कारभार केला, पण आता इतर लोकांनी कारखान्याचा ताबा घेतला आहे आणि सभासदांची पिळवणूक सुरू केली आहे. जाणीवपूर्वक सभासद वारस नोंदी करून घेतल्या जात नाहीत. घाटमाथ्यावरच्या सभासदांपुढे तांत्रिक अडचणी निर्माण करून त्यांना अक्रियाशील केले गेले आहे. या अन्यायकारक वृत्तीचा बीमोड करण्यासाठी सत्तांतर घडणे गरजेचे आहे. यशवंतराव मोहिते यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी रयत पॅनेलच्या पाठीशी ठाम रहा.
काँग्रेसचे कडेगाव तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, हिंगणगावचे सरपंच अशोक जाधव, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, सोनहिरा कारखान्याचे संचालक दिलीपराव सूर्यवंशी, युवराज कदम, सुरेश मोहिते, उपसरपंच संजय कदम उपस्थित होते.