सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे अन्नप्रक्रिया संस्थेची स्थापना करून, त्यातून शासनाला ५९ लाख ७८ हजार ५७२ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी लेखापरीक्षक प्रदीप विजय काळे यांनी आयुब बाबासाहब मोमीन (रा. गवळी गल्ली, सांगली) व कुमार रघुनाथ पाल (रा. सांगली) या दोघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ४ डिसेंबर २०१२ ते २५ जुलै २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयितांनी कसबे डिग्रज येथे पर्ल फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज मागासवर्गीय सहकारी संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून बीफ, फळे, फुले व इतर उत्पादने पॅकिंग करून त्याची बाजारपेठेत विक्री करणे, जनावरांची कातडी कमावणे व त्यापासून विविध उत्पादने निर्माण करणे या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मिळवला होता.संशयितांनी शासनाला दिलेल्या प्रस्तावानंतर वस्तूंची निर्मिती व त्याच्या मार्केटींगसाठी संस्थेला निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र संशयितांनी शासनाच्या निधीतून उत्पादन न घेता त्याचा गैरव्यवहार करून स्वत:च्या फायद्यासाठी ही रक्कम काढून घेतली होती.संशयितांनी यंत्रसामग्रीची अनामत देण्याच्या नावाखाली, बांधकामाच्या आगाऊ रकमेत, जमीन सुधारणा रकमेत अपहार केल्याचे लेखापरीक्षणात समोर आले होते. त्यानुसार लेखापरीक्षक काळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करत आहेत.
अन्नप्रक्रिया संस्थेतून शासनाला ६० लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल; सांगलीतील कसबे डिग्रज येथील प्रकार
By शरद जाधव | Published: March 02, 2023 7:42 PM