वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात मुसळधार पाऊस सुरू असून, येथे अतिवृष्टीची नोंद झाली. शनिवारी सकाळी ८ ते रविवार सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत ७० मिलिमीटर पावसासह एकूण ४५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणातील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. या परिसरात २५ जूनपासून पावसास सुरुवात झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या मान्सूनच्या पावसाने हळूहळू जोर वाढविला. २७ जून ते ३ जुलै या सात दिवसांत चांदोली धरणातील पाणी पातळी साडेपाच मीटरने वाढली आहे, तर धरणातील पाणीसाठा २.३४ टीएमसीने वाढला आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम विभागातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून ओढ्या-नाल्यांचे प्रचंड प्रवाही पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. तसेच ओढ्या-नाल्यांतील प्रचंड प्रवाही पाण्याबरोबरच गाळही धरणात मोठ्या प्रमाणावर येत आहे. ओढ्या-नाल्यांचे गढूळ पाणी वारणा नदीतही येत आहे. नदीच्या पातळीतही त्यामुळे वाढ झाली आहे. संपूर्ण शिवारातील भात व ऊस पिकांत पाणी साचून असल्याने पिकांच्या भांगलणीची कामे खोळंबली आहेत. या परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे. सध्या धरणात ५९३.६० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत ७० मिलिमीटर पावसासह ४५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (वार्ताहर) कोयनेत दोन टीएमसीने वाढ कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात तब्बल २.१४ टीएमसीने पाण्यात वाढ झाली आहे. कोयना येथे शनिवारी १५६, नवजा येथे १९६, तर महाबळेश्वरमध्ये १६४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. अवघ्या चोवीस तासांत २.१४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या १६.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
चांदोली परिसरात अतिवृष्टी
By admin | Published: July 04, 2016 12:24 AM