लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : ऊस उद्योगाबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुरु असलेल्या धरसोड वृत्तीमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. फक्त शहरी भागातील मतदार दुखावला जाऊ नये, याचाच विचार हे सरकार करत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी वर्गाच्या विकासाच्यादृष्टीने हे सरकार मारक ठरत आहे, असे प्रतिपादन विश्वास साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
ही संस्था चांगली सुरु असताना जे सभासद नाहक बदनामी करीत आहेत, अशा सभासदांवर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सभागृहात विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.प्रारंभी विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. विष्णू पाटील यांनी आदरांजलीचे वाचन केले, तर कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीस वाचन केले.
मानसिंगराव नाईक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाची धोरणे शेतकºयांना मारक ठरत आहेत. साखर व इथेनॉलबाबत एक ठोस धोरण ठरविणे गरजेचे आहे. शहरातील मतदार दुखावतील, म्हणून या धोरणामध्ये सतत बदल केला जात आहे. साहजिकच यामुळे शेती व शेतकरी अडचणीत आला आहे. विश्वास साखर उद्योग हा शेतकरी सभासद यांच्या विश्वासाच्या आधारावर चालत आहे.
यावेळी सुरेश चिंचोलकर, पी. के. अण्णा पाटील, बाबू नाकील आदींनी ठराव मांडले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, दिनकरराव पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, सुरेशराव चव्हाण, विराज नाईक, अशोकराव पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, अभिजित नाईक, बाबासाहेब पवार, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, रोहित नाईक, राजेंद्र नाईक, दिनकर महिंद, ए. ए. पाटील, राजेंद्र लाड, पी. एस. पाटील, विवेक नाईक, डॉ. राजाराम पाटील, प्रमोद नाईक उपस्थित होते. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.