सांगली : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारांसाठी विविध तेरा रुग्णालयांत सोय केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली. रविवारअखेर ही रुग्णसंख्या ७२वर गेली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले योजनेतून मिरज शासकीय रुग्णालय, सेवासदन रुग्णालय, वॉन्लेस रुग्णालय व भारती रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत. त्याशिवाय सांगली, मिरज व विट्यातील नऊ खासगी रुग्णालयांत उपचार सुरु आहेत, पण तेथे रुग्णांनाच सर्व खर्च करावा लागणार आहे. म्युकरमायकोसिसची औषधे व इंजेक्शन्स मात्र जिल्हा परिषदेत सशुल्क उपलब्ध आहेत. डॉ. पोरे यांनी सांगितले की, रुग्णालयांची संख्या वाढविल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने त्यांच्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याची मागणी रविवारी झालेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली.
दरम्यान, महात्मा फुले योजनेंतर्गत म्युकरमायकोसिसच्या सर्व रुग्णांवर मोफत उपचारांची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे, पण मोजक्याच खासगी रुग्णालयांत ही योजना लागू आहे. रविवारपर्यंतच्या स्थितीनुसार जिल्ह्यात यावर उपचार करणाऱ्या तेरा रुग्णालयांपैकी फक्त चारच रुग्णालयांत ही योजना आहे. उर्वरित नऊ रुग्णालये योजनेशी संलग्न नसल्याने तेथील रुग्णांना स्वत:च खर्च करावा लागणार आहे.
चौकट
आगीतून फुफाट्यात
या आजारावरील खर्च लाखो रुपयांच्या घरात जातो, त्यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होणार आहे. शासनाने सर्वच रुग्णांना नि:शुल्क उपचार देण्याची मागणी होत आहे.