घाटनांद्रे : अनेक अस्मानी संकटांवर मात करत कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा निर्मितीसाठीची शेडही सज्ज झाले आहेत. बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने तसेच औषधे, खते, मजुरांवर मोठा खर्च झाल्याने बळिराजा मोठ्या दराची अपेक्षा ठेवून आहे.
अवकाळी, अतिवृष्टीमुळे ढगाळ वातावरणानेही द्राक्षशेतीला मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे परराज्यातील कामगार गेल्याने मजुरांचाही तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मजुरांविषयी मोठी पंचाईत निर्माण झाली होती. अशा परिस्थितीही शेतकऱ्यांनी मोठ्या नेटाने द्राक्षबागा जगविल्या आहेत.
सध्या आगाप छाटणी घेतलेल्या बागांचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष दलालही नेहमीप्रमाणे रंगच आला नाही, गोडीच भरली नाही, वाहतुकीची समस्या, मालाला पुढे उठावच नाही, अशी विविध कारणे पुढे करून दर पाडून मागत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष शेतीला पूरक वातावरण आसल्याने त्याचबरोबर दोन वर्षांपासून पावसाने चांगलाच हात दिल्याने व काही भागात म्हैशाळ व टेंभू योजनेचे पाणी आल्याने द्राक्ष क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे चालू हंगामात उत्पन्नही मोठे राहणार आहे. त्याचबरोबर मिरज-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर बेदाणा निर्मितीसाठीची शेडही सज्ज झाली आहेत. कुची ते सांगोला दरम्यान हजारो बेदाणा निर्मिती शेडही उभारली जात आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी येत आसतात. येथे निर्माण केलेल्या हिरव्या बेदाण्याला मोठी मागणी सते. चालूवर्षी बेदाणा निर्मितीही मोठी असणार आहे.
चौकट
सध्याचे दर; प्रति चार किलोस
सुपर सोनाक्का -३५० ते ४१०, काळी द्राक्षे ३७० ते ४२०, तासगणेश १०० ते १२०, अनुष्का ४०० ते ४२०, मीडियम सुपर ३२० ते ३५०, शरद ५५० ते ६०० रुपये असा भाव मिळत आहे.
कोट
व्यापरीवर्ग विनाकारण विविध कारणे सांगून दर पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला बळिराजाने बळी पडू नये. भविष्यात त्याला चांगला दर अपेक्षित आहे.
- विष्णू जाधव, द्राक्ष बागायतदार, घाटनांद्रे
फोटो-०२घाटनांद्रे१,२