कवठे एकंद : ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना गळीत हंगामाच्या शेवटी पाठवलेल्या ऊसाचे बिल मिळाले नाही. कारखाना प्रशासनाकडे विचारणा करूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
ऊसबिलाअभावी शेतकरी अडचणीत आला असून, अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या टप्प्यातील ऊस बिले दिली नाहीत. कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या परिणामांचा फटका शेतीसह अन्य व्यवसायाला बसला आहे. शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, अनेक शेती कामे व सोसायटीचे पीककर्ज भागवणे हे अडचणीचे बनले आहे. एकूणच शेतकऱ्यावर दुष्काळात तेरावा महिना असल्याचे अनुभव येत आहेत. प्रामुख्याने शेतकरी वर्ग मजुरी, व्यापारी, कारखानदार, ग्राहक यांच्यावर अवलंबून असतो. कोरोना महामारीसारख्या काळात सर्वच क्षेत्रात कोरोनाची सबब सांगून पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुष्काळात तेरावा महिना असल्याचे जाणवत आहे.
साखर कारखान्यांना गळीतास ऊस गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत बिले देणे बंधनकारक असतानाही अनेक साखर कारखान्यांनी वेळेत बिले न देता टाळाटाळ केली आहे, यामुळे शेतकरी अधिक अडचणीत आला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडॉनच्या परिणामाने शेती अडचणीत येऊन शेतातील मशागतीची व खत भरण्याची कामे पैशाअभावी रखडली आहेत. ऊसाची बिले थकविणाऱ्या कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.