तासगाव : ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, त्यादिवशी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ज्या लोकांनी केले, त्यांना घरी बसवून बेईमानीचा बदला घेतला, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.भाजपच्या जनसंपर्क ते जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची तासगाव येथील बागणी चौकात सभा झाली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, प्रभाकर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी बेईमानी केली, त्यांच्या बेईमानीचा बदला घेतला. उद्धव ठाकरे काय करत आहेत आता? आपली शिवसेना कुठे राहिले ते पाहत आहेत. शरद पवारदेखील आता काय करत आहेत ते पाहा, फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून त्यांनी कटकारस्थाने रचली, त्या सर्वांना घरी बसवले, अशा किंचित राहिलेल्या लोकांना पूर्णपणे संपवण्याचे काम तासगावमधून करायचे आहे.
खासदार पाटील म्हणाले, आम्ही पाण्यासाठी नऊ दिवस उपोषण केले. तीन हजार लोकांनी मुंडण केले. पाच हजार महिला रस्त्यावर उतरल्या. तेव्हा तालुक्यातल्या पाणी योजना मार्गी लागल्या. गेली ३० ते ३५ वर्षे या सामान्य लोकांच्या जिवावर मी संघर्ष करतोय. इथून पुढेही करत राहू. पंतप्रधान मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघातील बूथ वॉरियर्सबरोबर संवाद झाला.
खासदारांचा रोहित पाटलांवर निशाणायावेळी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांचे नाव न घेता निशाणा साधला. विस्तारित टेंभू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, हे लक्षात आल्यावर तरुण सहकाऱ्याला उपोषणाचा दिखावा करावा वाटला. परंतु, चार तासातच बहिणीच्या मांडीवर झोपण्याची वेळ आली, अशा शब्दांत टीका केली.