सांगली : देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता सध्याच्या महाविकास आघाडीला खुपत आहे. त्यामुळे आकस बुद्धीने त्यांची सुरक्षा कमी केली आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, नक्षलवाद्यांबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळे गुप्तचर विभागाने त्यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल दिला होता. आता ते विरोधी बाकावर असतानाही त्यांना सुरक्षा कायम देण्याबाबतचा अहवाल पोलिसांनीही दिला आहे. तरीही त्यांची सुरक्षा कमी केली. यापुढे राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांना मानणारे लोक त्यांची सुरक्षा करतील. त्यामुळे शासकीय सुरक्षेची आम्हाला गरज नाही.
फडणवीस यांची लोकप्रियता या सरकारला खुपत आहे. राजकीयदृष्टीने, कपटबुद्धीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी घरातच बसतात, तरीही त्यांना सुरक्षा पुरवली जाते. त्यांच्या घराला कशाला सुरक्षा हवी आहे, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.
अतिवृष्टी, वादळ, कोरोना अशा संकटकाळात हे सरकार लोकांपर्यंत पोहोचले नाही. दुसरीकडे विरोधी पक्षनेते असूनही फडणवीस लोकांपर्यंत पोहोचले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सरकारला पाहवत नाही. त्यातूनच हा निर्णय त्यांनी घेतला आहे.