इस्लामपूर (जि. सांगली) : सत्तेचा दर्प चढलेल्या राज्य आणि केंद्रातील सरकारला लोकसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखवल्यावर त्यांना अनेक योजना आठवत आहेत. त्यातच त्यांना लाडकी बहिण आठवली. मात्र तिची सुरक्षा करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सत्ता कोणाच्या हाती द्यायची? सन्मान करणाऱ्यांच्या ? की अत्याचार करणाऱ्यांच्या याचा निर्णय आता जनतेनेच घ्यायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता खा. पवार यांच्या उपस्थितीत झाली. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत पवार यांना दाद दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील बहिणींच्या सन्मानासाठी कायमस्वरूपी व टिकाऊ निर्णय घेतले. त्यामुळे आमच्या माता-भगिनी सरपंच, सभापती, अध्यक्ष व महापौर झाल्या. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना जागा दाखविली. आता अडचणीत आल्यावर त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली आहे. म्हणून त्यांच्या हातावर काही रक्कम ठेवली जातेय. पण, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले. पुण्यातील सासवडजवळ अत्याचार झाला. सांगलीत चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार झाला. ही अत्याचाराची परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याचा विचार जनतेने करायला हवा.महाराष्ट्र मागे गेला..हल्ली ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्र एकाही क्षेत्रात पुढे नाही. दक्षिण व उत्तरेकडील काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे गेलेला दिसतो. महाराष्ट्र सावरायचा व पूर्व स्थितीत आणण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्याची सुरुवात आज साखराळेतून (ता. वाळवा) होत आहे. या वाळवा व शिराळा तालुक्यातून देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू झाल्याचा इतिहास आहे. बिळाशीचा सत्याग्रह येथून झाला. राजारामबापू पाटील यांनी येथूनच साखर कारखान्याची सुरुवात केली. आता महाराष्ट्र सावरण्याची व पुढे नेण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर टाकतोय, असे पवार यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सत्ताधारी अपयशी, शरद पवार यांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:07 PM