सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसील कार्यालयाच्या नियंत्रणाखाली गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत करण्यात आलेली आहे. या समितीने परदेश प्रवास करून आलेल्या तसेच जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांची माहिती तहसील कार्यालयाला देणे क्रमप्राप्त आहे. तरी काही ठिकाणी अद्यापही ही माहिती प्रशासनाला दिली जात नाही.
या साऱ्याला आता गावस्तरीय समित्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला. परदेश प्रवास करून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती तहसील कार्यालयांना देण्यासाठी मार्च महिन्यामध्येच गाव स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत करण्यात आली आहे. अनेक गावात बाहेरील जिल्ह्यातून प्रवासी स्थलांतरित होत असून त्यांची माहिती प्रशासनात दिली जात नाही.
यासंदर्भात जिल्हाधिकारी चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, १ मार्चपासून इतर जिल्ह्यातून आलेल्या सर्व व्यक्तींची यादी तयार करून ती ग्राम स्तरावर अद्ययावत ठेवावी. राज्य शासनाने लॉकडाऊन मधून सूट असणारे अगर अन्य जिल्ह्यातून सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीने आलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करून तहसीलदारांच्याकडे पाठवावी. या व्यक्तींची आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
विनापरवाना जिल्ह्यात येणा-या लोकांची यादीही तयार करून ती तहसिल कार्यालयाल द्यावी. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. काही गावस्तरीय समित्या या कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून येत आहे. या समित्यांनी आदेशाप्रमाणे कार्यवाही न केल्यास संबंधित समिती सदस्यांवर जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
खेराडेवांगीप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा स्मरणपत्र अभिजित चौधरी : अद्याप अहवाल नाही, उपाययोजना सुरूच राहणार
सांगली : कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी येथील मृत तरुण कोरोनाबाधित नसल्याचा खुलासा मुंबईच्या सायन रुग्णालयाने केला असला तरी अद्याप त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. या प्रकरणी मुंबई महापालिका व सायन रुग्णालयाला पुन्हा स्मरणपत्र पाठविले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी मंगळवारी सांगितले. खेराडेवांगी येथील मुंबईत राहणाºया तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारानंतर मृत तरुण कोरोनाबाधित असल्याची माहिती मुंबईतून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले व संपर्कातील ३० जणांना कडेगाव येथे संस्था विलगीकरण कक्षात हलविले. त्यांच्या स्त्रावाचे नमुनेही घेण्यात आले. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, सायन रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून हा मृत तरुण कोरोना बाधित नसल्याची माहिती दिली. आडनावातील साम्यामुळे हा गोंधळ उडाल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी चौधरी व डॉ साळुंखे यांनी सायन रुग्णालयाला पत्रव्यवहार करून अधिकृत अहवाल पाठविण्याची विनंती केली.
जिल्हाधिकारी व नोडल अधिकाºयांनी दोनदा दूरध्वनीवरूनही सायन रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी संपर्क साधला. मंगळवारीही सकाळी डॉ. साळुंखे यांनी संपर्क साधला पण त्यांचा दूरध्वनी उचलला गेला नाही. आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एका सायन रुग्णालयाला स्मरणपत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाचा अधिकृत अहवाल येत नाही, तोपर्यंत खेराडेवांगी येथील उपाययोजना सुरूच राहतील, असेही चौधरी यांनी स्प्ष्ट केले.