सांगली : कर्नाटकातील हिप्परगी बॅरेजचे दरवाजे वेळेत न उघडल्याने वारणा, पंचगंगा नद्यांमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाल्याचा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला. अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाने पाणीसाठ्याविषयीचे केंद्रीय जल आयोगाचे निर्देश धुडकावल्याची तक्रार केली.समितीने कर्नाटकच्या कृष्णा भाग्य निगमच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठविले असून अलमट्टी धरणात अनावश्यक पाणीसाठा ठेवल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सध्या जोरदार पाऊस होत आहे. अलमट्टी धरणातील शनिवारी (दि. २२) सकाळची पाणीपातळी ५१२.५६ मीटर होती. पाण्याची आवक ८३.९२५ क्युसेक इतकी होत आहे.जल आयोगाच्या निर्देशांनुसार अलमट्टी धरणात ३१ जुलै रोजी ५१३.६० मीटर पाणीपातळी आवश्यक आहे. पण धरण व्यवस्थापनाने त्याकडे कानाडोळा करत आजमितीला अनावश्यक व अतिरिक्त पाणीसाठा ठेवला आहे. पाऊसमान असेच जोरदार राहिले, तर काही दिवसांत अलमट्टीतील साठा धोकादायक स्तरावर पोहोचेल.पत्रात म्हटले आहे की, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे यापूर्वीच उघडणे आवश्यक होते, पण शुक्रवारी (दि. २१) उघडले गेले. त्यामुळे कृष्णेत पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. पंचगंगा, वारणा नद्या भरभरून वाहू लागल्या. नदीकाठावरील लोक चिंतेत आहेत. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याखाली जाण्याची भिती आहे. दरवाजे उघडण्यातील हलगर्जीपणामुळे राजाराम बंधारा, तेरवाड बंधारा पाण्याखाली आहे. नृसिंहवाडी परिसरात पाणीपातळी वेगाने वाढत आहे. पंचगंगा, वारणा नद्याही धोकापातळी गाठत आहेत.त्यामुळे सांगली, कोल्हापूरच्या अधीक्षक अभियंत्यांनी वेगाने पावले उचलली पाहिजेत. अलमट्टी धरण व्यवस्थापनाने जल आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. पत्रावर अजित वझे (रा. हिपरगी), प्रदीप वायचळ, प्रमोद माने, आदींच्या सह्या आहेत.मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावासमितीचे विजयकुमार दिवाण यांनी सांगितले की, समिती अलमट्टी धरण, हिप्परगी बॅरेजवर लक्ष ठेऊन आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे विशेष बैठकीची मागणी करणार आहोत. यावेळी समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, संजय कोरे, सतीश रांजणे आदी उपस्थित होते.
कर्नाटकने जल आयोगाच्या निर्देशांना फासला हरताळ, हिप्परगीचे दरवाजे उशिरा उघडले; वारणा, पंचगंगेमध्ये पूरसदृष्य स्थिती
By संतोष भिसे | Published: July 22, 2023 7:17 PM