कृष्णा-वारणेचे पाणी प्यायलेल्या अनेक जिगरबाज तरुणांनी देश-विदेशात आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव माेठे केले आहे. हे करीत असताना येथील मातीशी नाळही जपली आहे. असेच एक नाव भारतीय परराष्ट्र खात्यात कार्यरत असणारे विश्वास विदू सपकाळ... सध्या ते दक्षिण विभागात जॉईंट सेक्रेटरी पदावर कार्यरत आहेत.
विश्वास सपकाळ यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील गाैरगाव. पण आई रतन सपकाळ व वडील विदू नाना सपकाळ दाेघेही तत्कालीन सांगली नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक. यामुळे पिंड सांगलीचाच. शहरातील नगरपरिषदेच्या २३ नंबर, ७ नंबर, १ नंबर शाळेतून चाैथीपर्यंतचे शिक्षण झाले. चाैथीला असताना शिष्यवृत्ती परीक्षेत दुसरा क्रमांक आला. पुढे पाचवीला सांगलीतील सिटी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सातवीलाही शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्यानंतर दहावीच्या परीक्षेत पुणे बाेर्डात विश्वास चाैथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि सिटी हायस्कूलच्या गुणवंतांच्या यादीत त्यांचे नाव कायमचे काेरले गेले.
पुढे विलिंग्डनमधून बारावीची परीक्षा दिल्यानंतर वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स) झाले. कॅम्पसमधून नागपूरस्थित कंपनीमध्ये त्यांची निवड झाली. पण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वडिलांचे निधन झाले हाेते. त्यामुळे मन कुटुंबाकडे ओढ घेत हाेते. अखेर ते सांगलीला परतले.
दहावीला राष्ट्रीय प्रज्ञाशाेध परीक्षेत यश मिळाल्यानंतर नागपूर येथे आयाेजित एका शिबिरात डॉ. श्रीकांत जिचकर यांना ऐकण्याची संधी त्यांना मिळाली हाेती. जिचकर यांच्या भाषणातून त्यांच्या मनात प्रशासकीय सेवेचे बीज पेरले गेले. बुधगावच्या वसंतदादा महाविद्यालयात तसेच वालचंदमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकत्र आलेल्या तरुणांच्या ‘अभिनव ज्ञानप्रबाेधिनी’च्या माध्यमातून अभ्यास सुरू केला. १९९६ मध्ये ते आयआयएस (भारतीय माहिती सेवा) उत्तीर्ण झाले. दुसऱ्याचवर्षी आयएफएसमध्ये (भारतीय विदेश सेवा) त्यांची निवड झाली. या माध्यमातून गेल्या २२ वर्षांत त्यांनी मॉस्को, अर्मेनिया, शिकागो, सेंट पीटर्सबर्ग (रशिया) इजिप्तमधील कैराे, भारतापासून १९ हजार किलाेमीटरवर असलेल्या सुवामध्ये ‘भारतीय राजदूत’ म्हणून सेवा बजावली आहे. साेव्हिएत युनियनचा भाग असलेल्या अर्मेनिया व जॉर्जियाशी भारताचे संबंध सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे हाेती. नंतरच्या काळात २००५ मध्ये भारत-भूतान दरम्यानच्या संबंधामध्येही त्यांचे याेगदान राहिले. २००८ ते २०११ यादरम्यान त्यांना शिकागाे येथे पाठविण्यात आले. शिकागाेमध्ये सुमारे ६ लाख भारतीय वंशाचे लाेक आहेत. त्यांच्यासाठी भारत सरकारच्यावतीने त्यांनी माेठे काम केले. तेथे राबविलेले भारतातील ‘शासन आपल्या दारी’सारखे उपक्रम शिकागाेस्थित भारतीयांना भावले. २०११ मध्ये त्यांची रशियात नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी इकॉनॉमिक फाेरमसाठी सेंट पीटरबर्ग येथे दिलेल्या भेटीची संपूर्ण जबाबदारी सपकाळ यांच्याकडे हाेती. पुढे ते कैराे (इजिप्त) येथे उपराजदूत हाेते. यादरम्यान भारतात झालेल्या इंडिया-आफ्रिका फाेरम समिटच्या आयाेजनात त्यांच्याकडे माेठी जबाबदारी हाेती. ५४ देशांचा सहभाग असलेल्या या बैठकीमध्ये ४२ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले हाेते.
२०१६ मध्ये सपकाळ यांची फिजीमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. फिजीसह अन्य ६ पॅसिफिक आयलॅन्डशी भारतीय संबंध सुधारण्याचे काम त्यांनी केले. सध्या ते विदेश मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी, साऊथ पदावर कार्यरत आहेत. म्यानमारवगळता इतर नऊ आशियायी देशांमधील परस्परसंबंध हाताळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जून २०२० मध्ये आयाेजित भारत-ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांदरम्यानची व्हर्च्युअल समिट तसेच डिसेंबर २०२० मध्ये भारत व व्हिएतनामच्या प्रतिनिधींच्या व्हर्च्युअल समिटची जबाबदारी त्यांच्याकडे हाेती.
देश-विदेशात उच्चपदावर काम करीत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांनी मराठी तरुणांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी सुरू केलेल्या ‘पुढचं पाऊल’ संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. हे सर्व करीत असताना सांगलीशी असलेली नाळही त्यांनी जपली आहे. शक्य असेल तेव्हा ते सांगलीत येतात. आपल्या आजवरच्या यशात पाठीशी राहिलेल्या शाळा, संस्थांना सामाजिक जाणीवेतून मदत करतात. जुन्या मित्रांना भेटतात. सिटी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘आम्ही ८६’ या ग्रुपच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक याेगदान राहिले आहे.